लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवत सहा महिने कारावास व दंडाची शिक्षा
नाशिक : राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक येथील वरिष्ठ सहाय्यक रामचंद्र नरसू माकरे यांना लाच मागितल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमांतर्गत माकरे यांना सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील अन्य कलमान्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
शासकीय कामासाठी मंजूर वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप माकरे यांच्यावर होता. १६ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय पंचासमक्ष तीन हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले होते.
याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. विशेष प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्या समोर झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत वरील शिक्षा सुनावली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे, अपर पोलिस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळो, तसेच पोलिस हवालदारांनी कामकाज पाहिले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोऱ्हाडकर यांनी बाजू मांडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी.



































