रावेर (प्रतिनिधी), दि. २२ :रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव येथे तापी नदी काठालगतच्या शेतात जाळ्यात अडकलेल्या बिबट वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील जाळ्यात बिबट अडकलेला असल्याची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक, यावल श्री. समाधान पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्री. श्रीकांत काळे, मानद वन्यजीव रक्षक जळगाव श्री. रविंद्र फालक, पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजीत पाटील, डॉ. स्नेहल मोटेगावकर, डॉ. प्रदीप काळे, डॉ. राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासक श्री. अमन गुजर व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पाहणीदरम्यान सदर बिबट मृत अवस्थेत आढळून आला. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी मृत्यूची खात्री करून तत्काळ शवविच्छेदन करण्यात आले. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृत बिबटाचे व्हिसेरा नमुने गोळा करून सिलबंद करण्यात आले आहेत.
प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, डीहायड्रेशन व हिट स्ट्रोकमुळे बिबटाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी वनरक्षक लोहारा यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जंगल परिसरात रानडुकरांसाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्यांमुळे इतर वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.






























