भुसावळ : भुसावळ नगरपरिषदेत पथविक्रेता समितीची स्थापना करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय हॉकर संघटनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. पथविक्रेत्यांच्या प्रश्नांवर तातडीने समिती स्थापन करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्मरणपत्रानुसार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी भुसावळ शहर पथविक्रेता व फेरीवाले यांचा सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानुसार नगरपरिषद पथविक्रेता निवडणुकीत शासनाने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत सन २०२४ मध्ये एकूण आठपैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीला दोन वर्षे पूर्ण होत आली असूनही भुसावळ नगरपरिषदेकडून अद्याप पथविक्रेता समिती स्थापन करण्यात आलेली नसल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र नियमांतील तरतुदींनुसार समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करून पथविक्रेता समिती लवकरात लवकर स्थापन करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
स्मरणपत्रावर सह्या करणारे सदस्य :
१. रघु शेख मनापाटील
२. सागर ठाकूर
३. उत्तम राजपूत
४. गजानन वाघचौधरी
५. जगन्नाथ पुरोहित
६. नजीक वर्मा
७. मुकेश सुभाषकुमार जनवारे
८. विनोद वसंत जैन
९. विनायक लाकुरसिंग जैन अशांनी मुख्याधिकारी, भुसावळ नगरपरिषद यांच्याकडे समिती स्थापन करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.



































