भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील बसस्थानकाजवळ गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर लक्ष ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बसस्थानक गेटजवळील रिक्षा स्टॉप परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी गावठी पिस्तुल आढळून आले. आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. बाग फरहत, अफजल हुजूर सिंदरी, भोपाळ, मध्यप्रदेश) असे असून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गु.र.नं. 121/2026 अन्वये आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चौकशीत आरोपी हा भोपाळ येथील गुन्हेगारी रेकॉर्डवरील असल्याचे समोर आले आहे. १४ मार्च २०२६ रोजी भोपाळ येथील अशोका गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका व्यक्तीवर गोळीबार करून फरार झाल्याची माहितीही समोर आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहेत.




































