वरणगाव : साईबाबानगर, दर्यापूर शिवारातील लालित विष्णू पाटील याच्यावर आयुध निर्माणीतील एका कर्मचाऱ्यास दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी ९ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याच्यावर बकरी चोरीचा आरोप झाल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात बकरी चोरी केल्याच्या संशयावरून आयुध निर्माणीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाटील याला एस्टेट कार्यालयात ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला वरणगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, या प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल न करता संबंधिताला सोडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता परस्पर आर्थिक तडजोड केल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा चोरीच्या संशयातील प्रकरणांमध्ये योग्य ती कायदेशीर प्रक्रिया न झाल्यास गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणात नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली, प्रकरण हाताळणारे कर्मचारी कोण होते आणि कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही, याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



































