डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिस विभागाच्या वतीने सोमवारी (ता. २१) गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे वाद्य चालक-मालकांची बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर रोडवरील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात दुपारी साडेबारा ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांपर्यंत ही बैठक झाली.

या बैठकीस भुसावळ शहरातील सुमारे १०० ते १२० गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच मंडळांकडून नियुक्त करण्यात आलेले डीजे वाद्य चालक-मालक उपस्थित होते. यावेळी विसर्जन मिरवणुकीचा मार्ग, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांबाबत पोलिस प्रशासनाकडून सविस्तर सूचना देण्यात आल्या.
नाहाटा चौकातून मुख्य मिरवणूक
भुसावळ शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक नाहाटा चौक येथून मोटूमल चौक मार्गे पुढे जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांनी रॉंग साईडने गणेशमूर्ती किंवा वाहने नेऊ नयेत. तसेच मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.
डीजेच्या आवाजावर नियंत्रणाचे निर्देश
विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविताना कोणत्याही प्रकारची स्पर्धा करू नये. एकमेकांपेक्षा मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचा प्रयत्न टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले. डीजे वाद्यांमध्ये वापरण्यात येणारे प्रेशर हॉर्न/प्रेशर यंत्रणा काढून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शासन तसेच पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनीविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळे व डीजे चालक-मालकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
शांतता व शिस्त राखण्याचे आवाहन
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व गणेश मंडळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी केले.
बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मिरवणुकीच्या नियोजनासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. आगामी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गणेश मंडळे आणि डीजे चालक-मालकांना दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.



































