पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव, भूवन आदी गाव शेतशिवाराची केली पाहणी..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यात सर्वच भागात अतिवृष्टी होत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले पाहायला मिळते आहे. बऱ्याच ठिकाणी काढणीला आलेले पीक गुडगाभर पाण्यात गेले आहे अनेक गावे पुराखाली जाऊन लोक बेघर झाली आहे याच परिस्थिती आढाव घेण्यासाठी राज्यातील मंत्री आमदार वेगवेगळ्या भागात दौऱ्यावर जात आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबत तेथील परिस्थिती व समस्यावर पाहणी करत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पेठ तालुक्यात देखील खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची पाहणी दि.25 सप्टेंबर 2025 रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचे आणि अहवाल शासनास सादर करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव, भूवन आदी गावातील शेतशिवारात जाऊन शेतकाऱ्यांच्या नागली, वरई, भात, उडीद, वाल या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार आशा गांगुर्डे, गोवर्धने गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, नायब तहसीलदार दिपक, गोकुळ झिरवाळ यांच्यासह अन्य अधिकारी स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीबाबतचे सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने पीक नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल शासनासकडे पाठवावा. तसेच आवश्यक असल्यास गरज असेल त्याठिकाणी शेतकऱ्यांना वैद्यकीय सेवा देखील पुरवण्यात याव्या. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिके ऐन फुलोऱ्यात असतांना नष्ट झाली आहे.

































