मुक्ताईनगर प्रतिनिधी (धनराज मांडवकर ) शहरात सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. संभाव्य कारवाईच्या चर्चेनंतर काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानाबाहेरील साहित्य हटविण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पायी चालणाऱ्यांना होणारा त्रास आणि अपघाताचा धोका वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत शहरातील रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता स्वखुशीने अतिक्रमण हटवावे, असेही अनेक नागरिकांचे मत आहे.



































