रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा ; आरोपीला अडकवून पैशांची उकळपट्टी करण्याचा डाव उधळला
जळगाव, दि. ३१ : रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने धक्कादायक कटाचा पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाला त्याच्याच नातेवाईकाने जाणीवपूर्वक ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्याच्या कुटुंबाकडून पैशांची उकळपट्टी करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जतीन रविंद्र सैंदाणे आणि एमडी ड्रग्ज पुरवठादार चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव कॉलनी परिसरात २९ जुलै रोजी पोलिसांनी कल्पेश सतीष रायसिंग (वय २६, रा. वालकी, ता. चोपडा) याला मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थासह अटक केली होती. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
तपासादरम्यान कल्पेश रायसिंग याने पोलिसांना सांगितले की, त्याचा नातेवाईक जतीन सैंदाणे याने वारंवार जळगाव येथे जेवणासाठी येण्याचा आग्रह केला होता. त्याच्या आग्रहावरून तो जळगावला आला असताना पोलिसांनी त्याला अडवून मोटारसायकलच्या सीटखालून एमडी पावडर जप्त केली. मात्र ही पावडर आपल्या गाडीत कशी आली याची कोणतीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि चौकशीच्या आधारे तपासाची दिशा बदलली. तपासात जतीन सैंदाणे हा शेअर मार्केटमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाल्याने कर्जबाजारी झाल्याचे तसेच त्याला एमडी ड्रग्जचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले. संशय बळावल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने धक्कादायक कबुली दिली.
चौकशीत जतीनने भुसावळ येथील चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार याच्याकडून एमडी ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर १५ जुलै रोजी अमळनेर येथे जाऊन कल्पेश रायसिंगच्या मोटारसायकलच्या सीटखाली एमडी पावडर ठेवली. पुढे २८ जुलै रोजी जेवणाच्या बहाण्याने त्याला जळगावला बोलावून स्वतःच पोलिसांना गुप्त माहिती दिली. पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी ‘तोडीपाणी’ करून त्यातून स्वतःला आर्थिक लाभ मिळेल, तसेच पोलिसांशी ओळख असल्याचे भासवून कल्पेशच्या वडिलांकडून पैसे उकळता येतील, या उद्देशाने हा संपूर्ण कट रचल्याची कबुली त्याने दिली.
या तपासात एमडी ड्रग्ज पुरवठादार म्हणून चेतन दत्तात्रय वानखेडे ऊर्फ चंदू सोनार याचाही सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे जतीन सैंदाणे आणि चेतन वानखेडे या दोघांना अटक करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६१(२) अन्वये गुन्हेगारी कटाचा आरोपही वाढविण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून एमडी ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोधही पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.



































