स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे मंगळसूत्र व रिक्षासह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
भुसावळ : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास संबंधित महिला बाजार करून पायी घरी जात होत्या. दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळ एक रिक्षा त्यांच्याजवळ थांबली. रिक्षाचालकाने ‘तुम्हाला घरी सोडतो,’ असे सांगितल्याने त्या रिक्षेत मागील बाजूस बसल्या. त्यावेळी रिक्षेतील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली.
याप्रकरणी महिलेने १ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २००/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ संशयित आढळून आल्यानंतर वसीम शेरअली तेली (३८, रा. फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (२६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (३६, रा. साती मजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र (किंमत १ लाख रुपये) तसेच एमएच १९ ई ६५६३ क्रमांकाची तीनचाकी रिक्षा (किंमत २५ हजार रुपये) असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वसीम शेरअली तेलीविरुद्ध यापूर्वी तीन गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीसंदर्भातील, तसेच रामानंदनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीसंदर्भातील गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले. वसीम अजमल खान याच्याविरुद्धही एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलिस हवालदार अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने कारवाई केली.



































