जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल..

पोलीस वार्ता, नाशिक | विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठीच्या नाशिक जिल्ह्यातील जाहीर प्रचाराची आज, दि.18 नोव्हेंबर 2024 सोमवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. जाहीर प्रचाराची सांगता आज झाल्याने कोणत्याही उमेदवार अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल, असे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचार सांगते संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाचे प्रमुख राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा म्हणाले की, मतदान संपण्याकरिता निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तास आधी म्हणजेच आज दि. 18 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6.00 वाजता निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला आहे. यामुळे मतदान संपण्याकरिता निश्चित वेळ संपण्याच्या 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किवा मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत, तसेच घेता येणार नाहीत. चलचित्र, दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचाद्वारे कोणतीही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही. या कालावधीत ध्वनीक्षेपक यंत्र वापरास बंदी आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय / पक्ष कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशांच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे. याच कालावधीत जनमत कलचाचणी किंवा कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती इलेक्ट्रॅीनिक माध्यमात प्रदर्शित करणेस मनाई आहे. या तरतुदींचा भंग करेल ती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 च्या कलम 126 नुसार शिक्षेस पात्र असेल, असे त्यांनी नमूद केले.
निवडणुका खुल्या मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून दि.20 नोव्हेंबर 2024 मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. तसेच दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, अवैध पैसा, दारू, भेटवस्तू वाटपावर निर्बंध असणार आहेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके सतर्क असून याबाबत नागरिकांना सी-विजील (C-Vigil) ॲपवर तक्रार दाखल करता येईल. FST आणि SST पथकासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही त्यासाठी तैनात असतील.
जिल्ह्यात 15 विधानसभा मतदार संघांसाठी एकूण 4922 मतदान केंद्र असून मतदान पथकांना साहित्य वाटप दि.19-11-2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून संबंधित मतदारसंघांचे साहित्य वाटप केद्रांमधून करण्यात येईल. प्रत्येक मतदान पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी तसेच एक शिपाई कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी असतील. प्रत्येक विधानसभा मतदार संघाचे ठिकाणी केंद्रांच्या संख्येनुसार 10 टक्के राखीव मतदान पथके ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात 24610 आणि 2461 राखीव असे एकूण 27071 कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी दिली. जिल्ह्यात मतदानासाठी बीयु- 7026 सीयु- 5899 आणि व्हीव्हीपॅट- 6391 वापरण्यात येत आहेत. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी 511 बसेस, 91 मिनी बसेस आणि 1017 जीप्स या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
मतदानासाठी आवश्यक पुरावे-



























