बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा, नातेवाईक यांचा समावेश..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आपल्या मृत्य भावाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे कुटुंबीय अनुप अनिल बेग यांनी दि.29 सप्टेंबर 2026, दुपारी 12 वाजल्यापासून नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. संपूर्ण कुटुंबीय व समर्थकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनाने सदगुरू हॉस्पिटलच्या निष्काळजीपणावर लक्ष वेधले आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर मंडप बांधून मृत्यू पावलेल्या स्व. निखिल बेग यांच्या प्रतिमेला समोर ठेवून त्याभोवती बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले आहेत. कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा आणि इतर नातेवाईक यांचा समावेश असून सर्व लोकशाही मार्गाने शांतपणे आपल्या न्याय हक्कासाठी मंडपात बसले आहेत. मंडपामध्ये लावलेल्या बॅनरवर “सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, त्यास जबाबदार डॉक्टर व स्टाफ यांना शिक्षा व्हावी, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल कायमचे बंद करावे” असा ठळक मजकूर लिहिलेला आहे. तसेच हॉस्पिटलची संबंधित काळातील सीसीटीव्ही फुटेजची प्रत मिळावी आणि चौकशी करून मृत निखिल बेग याची पत्नी आणि मुलाला न्याय मिळावा. अशा मागण्या बॅनरवर नमूद केल्या आहे.

उपोषणकर्ते अनुप बेग यांनी उपोषणापूर्वी दिलेल्या निवेदनात, भावाच्या मृत्यूची चौकशी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली व्हावी, संबंधित सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जतन करून द्यावे, शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा तसेच आपल्याला व साक्षीदारांना संरक्षण मिळावे, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.




































