सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद; आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला
कापूरहोळ (ता. भोर) येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करणाऱ्या राजगड पोलिसांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर FIR दाखल केली आहे. पत्रकार राम पाचकाळे यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने या प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ येथील हायवे रोड परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार राम पाचकाळे हे मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होते. त्यावेळी हॉटेल आनंद व आनंद वाईन्सचे मालक आनंद काशिनाथ दळवी, त्यांचा मुलगा तसेच इतर संबंधित व्यक्तींनी त्यांना अडवून “येथे काय काम आहे, येथे येऊ नकोस” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरुवातीला राजगड पोलीस स्टेशनकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटना गंभीर स्वरूपाची असून पत्रकाराच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप असल्याने संज्ञेय गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार राम पाचकाळे यांनी केली होती.
दरम्यान, न्याय मिळत नसल्याचा आरोप करत राम पाचकाळे यांनी दिनांक ११ मे २०२६ रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राजगड पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. १८२/२०२६ दाखल करण्यात आला.
या FIR मध्ये आनंद काशिनाथ दळवी, त्यांचा मुलगा व इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२)(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल कोल्हे करीत आहेत.
दरम्यान, सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल करून नंतर आंदोलनानंतर FIR दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्रकार संघटनांनीही या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


























