मुक्ताईनगर – शहरात भंगार वाहतूक करणाऱ्या दहा चक्का ट्रकबाबत संशयास्पद माहिती समोर आली असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एम .एच.२० सी.टी.८००१ क्रमांकाच्या भंगार ट्रकमध्ये एमएसईबी (महावितरण) च्या तारांचे बंडल भरले जात असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर येथील सुज्ञ नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार स्वरूपात दिली होती.

या तक्रारीची तातडीने दखल घेत मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी संबंधित ट्रक ताब्यात घेऊन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणला.
पोलिसांकडून ट्रकची प्रथमदर्शनी चौकशी करण्यात आली असता त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे सांगण्यात आले.मात्र, ट्रक पूर्णपणे खाली न करता केवळ वरवर तपासणी करून पुन्हा तो भंगार भरलेला ट्रक पॅक करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. सदर ट्रकमध्ये प्रत्यक्षात एमएसईबीच्या तारांचे बंडल किंवा तार होती का ? याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, ट्रक पूर्णपणे खाली करून सखोल चौकशी केल्याशिवाय सत्य समोर येणार नाही. तसेच या ट्रकमधील भंगार कायदेशीर स्वरूपात आहे का? त्यासाठी आवश्यक परवाने आहेत का? हे देखील मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुक्ताईनगर परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने सखोल व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.























