सहा शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान, पोलिसांकडून कारवाईची मागणी
वरणगाव (ता. भुसावळ) – तालुक्यातील कठोरा ब्रुदूक परिसरातील तापी नदीकाठी शेतीसाठी बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची अज्ञात चोरट्यांकडून तोडफोड करून तांब्याच्या वायंडिंगच्या तारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सहा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, दि. १७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी नदीकाठच्या शेतांमध्ये बसविलेल्या मोटारींचे कव्हर फोडून आतील वायंडिंगच्या तारा काढून नेल्या. सकाळी शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. मोटारींचे आतील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले.
यापूर्वीही अशाच प्रकारे चोरी झाल्याची तक्रार वरणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली होती. मात्र अद्याप आरोपींचा मागोवा लागलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “पोलिसांचा धाक राहिलेला नाही. चोरटे वारंवार चोरी करत आहेत,” अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक मोटारीमागे सुमारे नऊ हजार रुपयांचे नुकसान होत असून सहा मोटारींची तोडफोड झाल्याने एकूण मोठा आर्थिक फटका बसला आहे. मोटारी दुरुस्त होईपर्यंत पिकांना पाणी देणे कठीण असल्याने उभ्या पिकांवरही संकट ओढवले आहे.
या घटनेत सुभाष पाटील, राहुल वासुदेव पाटील, पिंतांबर पाटील, मधुकर दयाराम पाटील, प्रभाकर पाटील व सुभाष पाटील यांच्या मोटारींची तोडफोड करण्यात आली आहे. रात्रीची गस्त वाढवावी, नदीकाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.




































