भुसावळ : शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या नगराध्यक्ष पदावरून आरोप-प्रत्यारोपांचा वाद चांगलाच तापला असून, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांनी आपल्याविरोधात खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण भुसावळ शहराच्या रहिवासी नसल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत. आपल्या कुटुंबाचा भुसावळाशी जुना संबंध असून, सन १९४९ पासून आजोबा रेल्वे सेवेत कार्यरत होते आणि तेव्हापासून कुटुंब येथे वास्तव्यास असल्याचे त्यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळून लावले.
यावेळी त्यांनी मंत्री संजय सावकारे, प्रमोद सावकारे आणि रजनी सावकारे यांच्यावर गंभीर आरोप करत, खोट्या कामांसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला. तसेच, संबंधित प्रकरणात सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायालयाकडून सहा आठवड्यांचा दिलासा मिळाल्याची माहिती देत, सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” असेही त्या म्हणाल्या.
नगरपालिका निवडणुकीसंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आपण वडिलांची कागदपत्रे जोडून निवडणूक लढवली. तर रजनी सावकारे यांनी त्यांच्या पती संजय सावकारे यांच्या जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढविल्याचा आरोप त्यांनी केला. रजनी सावकारे यांचा जन्म, शिक्षण व विवाह गुजरातमध्ये झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही नगराध्यक्षा गायत्री गौर भंगाळे यांनी दिली.या आरोपांमुळे भुसावळच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























