मुळशी (पुणे ग्रामीण) संतोष मोहिते भोर पुणे ।लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने पौड पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे पावणे सहा वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४५) असे असून ते सुसगाव (ता. मुळशी) येथील रहिवासी आहेत.तक्रारदार (वय ४५) यांच्या विरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात जप्त केलेले वाहन परत न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात शिंदे यांनी सुरुवातीला १ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार १८ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. पडताळणीनंतर तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मुळशी बीट कार्यालयात सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये स्वीकारताना शिंदे यांना एसीबीने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील एसीबीची कारवाई पुन्हा चर्चेत आली आहे .




































