भुसावळ : नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र समितीने अपात्र ठरविल्यानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींना वेग आला आहे. या निर्णयाविरोधात गायत्री भंगाळे यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट पिटीशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पालिकेमध्ये सध्या नगराध्यक्ष पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार देण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाच नगरसेवकांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांनी पालिका कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पालिका परिसरात कार्यकर्त्यांकडून आतषबाजी करण्यात आली. तसेच नगरसेवकांचा ताफा शहरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे रवाना झाला. तेथे अभिवादन करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
मात्र, प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार नेमका कोणाच्या आदेशाने स्वीकारण्यात आला, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत आदेश देण्यात आले आहेत का, याबाबत स्पष्टता नसल्याने शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडीकडे भुसावळकरांचे लक्ष लागून आहे.


























