यावल तालुक्यातील आकलूद गावात १० मार्चपासून कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मुखातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी मोठा पेंडाल उभारण्यात आला असून दररोज लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी आयोजकांकडून पेंडालमध्येच निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दररोज दुपारी १ वाजता सुरू होणारी कथा सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालते. सध्या परिसरात तापमान सुमारे ४० अंशांच्या आसपास असल्याने भाविकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पेंडालमध्ये एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने काही काळ भाविकांमध्ये तारांबळ उडाली. उष्माघातामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कथा स्थळी सुरक्षेसाठी काही बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. मात्र काही बाऊन्सर भाविकांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याची तक्रार भाविकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही भाविकांकडून केली जात आहे.




































