भुसावळ- नगरपालिकेत बहुमत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिकेत भेट देवून प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. गटनेते युवराज लोणारी यांनी पहिल्यांदाच पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांना विविध विभाग, कामकाजाची कार्यपद्धती सांगितली.
जळगाव रोडवरील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून नगरसेवक पालिकेकडे रवाना झाले. सर्व नगरसेवकांना भगवे फेटे बांधून पालिकेत नेण्यात आले. नवीन सदस्यांना कामकाजाची व विविध विभागांची माहिती देण्यात आली. यासोबतच जलशुद्धीकरण केंद्राची नवनिर्वाचित पाहणी नगरसेवकांनी करण्यात आली. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्यासोबत चर्चा केली. लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे या पालिकेत उपस्थित नव्हत्या. भाजपच्या नगरसेवकांच्या भेटीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. नवीन सदस्यांना कामकाजाची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबवल्याचे गटनेते लोणारी यांनी सांगितले.




































