रावेर (साजित शेख) तालुक्यातील सावदा शहरात सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये विदेशी दारूची बेकायदेशीर साठवण आणि विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली.
दि. २५ मार्च २०२६ रोजी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शहरातील सहकारी दुध संस्थेमध्ये एका व्यक्तीने विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. दुध डेअरीच्या किचन रूममध्ये तपासणी केली असता एका बॉक्समध्ये ७५० एमएलच्या ९ सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे १३ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय ४६, रा. सावदा) याने दारू विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोहेकॉ उमेश पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असून, या बेकायदेशीर कारवाईमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ उमेश पाटील, पोना जाकीर मन्सुरी आणि पोकॉ मयुर पाटील यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे सावदा परिसरात खळबळ उडाली आहे.




































